Sunday, September 09, 2007

सखी शेजारिणी तू हसत राहा..

दारावरची टकटक ऐकुन मी दार उघडले. "थोडा वेळ आहे का?"
मी म्हटले "हो, या ना आत".
निळे डोळे, भुरभुरते केस, चेहर्यावर गोड स्मित घेऊन ती म्हणाली, "मी तुझी शेजारिण, आक्चुअली, माझे इंटरनेट सकाळपासन बंद पडलेय, तू मदत करू शकशील का?"
"हां, नक्कीच, आलोच हां"

घरात शिरलो. दोन बेडरूम च्या प्रशस्त अपार्टमेंट मध्यी ही बया एकटीच राहात असावी असे एकंदरीत दिसत होते. मी एकदोनदा वायर्स इकडे-तिकडे हलवून, राऊटर रिबूट करून वगैरे पाहिले. ३-४ मिंटात इंटरनेट सुरू झाले.
"वा, एक्सपर्ट आहेस अगदी." आनंदून माझी शेजारीण उदगारली.
"अहो, असे काही नाही. मी असल्याच फिल्ड मध्ये जॊब करतो. त्यामुळे माहिती आहे."

पूर्ण घरभर तिने स्वताचेच फोटो लावले होते.
"छान दिसताय हो तुम्ही या फोटोंमध्ये!" मी.
"का? तशी दिसत नाही होय?"
"अहो, त.. त ..तसे नाही .... पण..."
"अरे असु दे. मी ओपेरा सिंगर आहे ना. तर हे सगळे जाहीरातींचे फोटॊज आहेत. हा न्युओर्क ला असलेल्या कार्यक्रमाच्य जाहीरातीचा, हा पॆरीसचा....वगैरे ..वगैरे.."
"वा, बर्याच फ़िरलेल्या वाटताय हो तुम्ही"
"हो, हो, आवडतं मला"..
*******
कधी इंटरनेट, कधी फोन, कधी काही. माझे आणि माझ्या शेजारिणीचे ऋणानुबंध चांगले जुळत गेले.
*******
"वा, यू आर लूकिंग ग्रेट टुडे!"
" हा हा, रू ... तू.... डोंट फ़्लर्ट, ओके?"
ही बाई तोंडाचा विलाक्शण आकार करून असे काही ऋतु म्हणते की वाटते, बाई तु कशाला एवढी तसदी घेतेस. राहू द्या ऋतु म्हणायचे!
"तुमच्या कडे बरेच सामान दिसतेय, काही मदत लागेल का?" मी.
"अरे, असु दे, एवढेसेच तर आहे. मला नेता येईल व्यवस्थित. आज लायब्ररीत लहान मुलांसाठी चित्रकलेची परिक्शा ठेवली आहे मी. तर त्याचेच सगळे सामान आहे. बराय मी निघते, उशीर होइइल परत".
************
हापिसातून येताना वा जाताना कधी ना कधी हिचे दर्शन व्हायचेच.
************
"अहो, तुम्ही इतके वेळा म्हणता, की ओपेरा सिंगर आहात म्हणून, गाऊन तरी दाखवा, तसे मला काही समजणार नाही, तरीही..." मी.
"अरे नक्की, कधी येतोस? असे कर या शनवारी ये सकाळी. मी तुला पियानो वाजवून दाखवेल. मलाही सुट्टीच आहे. नाहीतर दररोज ४-५ तास मुलांना पियानो शिकवायला जाते ना, या शनिवारी तसली काही घाई नाही."

मी विसरलो होतो. दारावर थाप ऐकु आली. "अरे येतोयस ना? मी सगळी तयारी करून ठेवली. अगदी कॊफी सुद्धा तय्यार आहे!"
मनात म्हटले किती उत्साह या बाईला! आठही वाजले नाही अजून तर शनवारचे! चला फ्री कोफी मिळतेय ना!
अर्थात मला ओपेरातले जितके समजायचे होते तितकेच समजले. तिनेही तसा काही मला फार त्रास दिला नाही!
सर्व घरात जुने फर्निचर पसरलेले. कॊफी पिता-पिता ती सांगत होती. हा कपबर्ड १९ व्या शतकातला बरे का. आणि ही आलमारी ७० वर्षे जुनी आहे. मला संग्रह करण्याची आवड आहे. लंडनमध्ये असताना विकत घेतली. मेल्यांनी शिपींग करताना तोडली बघ ईथे!"

************

"पुढच्या आठवड्यात माझे पुस्तक प्रकाशीत होणार आहे!"
"हो का? कश्यावर लिहीले आहेत आपण?"
"अठराव्या शतकातल्या एका ओपेरा सिंगर वर लिहीले आहे. ७-८ दिवसात होईल प्रकाशित. तुला मी एक कॊपी देइइन पुस्तकाची. खूप मदत केलीस तू मला"
"मदत वगैरे म्हणू नका हो. पण.. नक्कीच, आवडेल मला पुस्तक वाचायला."
मनात म्हटले काय अफलातून बाई आहे. चार-पाच तास मुलांना शिकवते, नन्तर लायब्ररीत जॊब करते. ओपेरा ची प्राक्टीस करते. पुस्तक लिहीते. तरी नेहमी चेहर्यावरचा उत्साह ओसंडून वाहत असतो.

"या आधी कुठे राहायचा हो तुम्ही?" - मी.
"मी ना २० वर्षे लंडन मध्ये होते. नंतर फ़्रांस मध्ये ७-८ वर्षे. मग इटाली माझा नवरा तिथे इंजिनीयर होता. मग जर्मनीत त्याची बदली झाली मग तिथे गेली. गेल्या २५ वर्षांपासून मात्र अमेरिकेतच"

"तुमचे वय आहे तरी किती? मी चकित होऊन विचारले.
"अरे मी ना, ८९ पूर्ण करेन या नोवेंबर मध्ये"
"अहो तुम्ही या वयात एवढे सगळे करता आणि तरीही तुमचा चेहर्यावरचा उत्साह कधी कमी दिसत नाही!"
"ह्म्म .. पण मला एखादा वर्ष तरी भारतात राहण्याची इच्छा आहे".
"हो, अहो नक्की या. खूप छान आहे माझा देश. आवडेल तुम्हाला"
या माझ्या शेजारिणीने मला भारावून टाकले. तृप्त हौउन आयुष्य जगत असलेली अशी माणसे पाहिली की त्यांच्या समुद्रासारख्या अनुभवासमोर आपले विश्व यत्कश्चित वाटायला लागते.
"अच्छ, भेटू या पुन्हा!"
"हो,हो "
घराचे कुलूप उघडताना मनात विचार करत होतो, असे वाटतेय की तू फक्त ८९ वर्षांची मुलगी आहेस, आणि छोट्या-छोट्या गोष्टींनी डिस्टर्ब होणारा मी २८ वर्षांचा म्हातारा! सखी शेजारिणी तू अशीच हसत राहा ....

0 Comments:

Post a Comment

<< Home